निलेश राणेंच्याविरोधात काँग्रेसकडून हुसैन दलवाई किंवा भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी?

0
1106

चिपळूण , दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेसने रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात राज्यसभेचे खासदार हुसैन दलवाई किंवा अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी देण्याची मागणी कोकणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे, अशी माहिती  काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई यांनी दिली आहे.  

लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागा वाटप निकालात निघाले आहे.  तर इतर प्रादेशिक पक्षांना आघाडीमध्ये सामील करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.  त्यामुळे काही जागा घटकपक्षांना  सोडाव्या लागणार आहेत. कोकणातील दोन जागांबाबत पक्षश्रेष्ठींनी कोकणातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.   त्यावेळी  त्यांनी राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई व डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नावाची शिफारस केली.

या दोन नेत्यांची मतदारांमध्ये  प्रतिमा उजळ  आहे. दोघेही काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत.  रत्नागिरी व सिंधुदुर्ग  दोन्ही जिल्ह्यात कॉंग्रेसचे संघटन आहे. पक्षांने दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल. त्याचबरोबर पक्षाने आघाडीचा उमेदवार दिल्यास आम्ही त्याचेही काम करू, अशी ग्वाहीही  कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिली आहे, असे दलवाई यांनी सांगितले.