निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाहीत

0
360

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणेंकडून शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला आहे. निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाहीत. ते नुसतेच बोलतात. आपण कोणामुळे मोठे झालोत हे त्यांनी विसरू नये, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. ऐन निवडणुकीच्यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. सरकारी गाडी घेऊन ते फिरत होते. त्यांच्या विरोधात केसही टाकली होती. त्यांना माहीतच असेल, असं सांगतानाच आपण कोणामुळे मोठे झालो हे ते विसरले असतील. बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले. काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका, असा सल्लाही खैरे यांनी दिला.

उद्धव ठाकरेंमुळेच कोरोनावर मात
मराठवाड्यातले आम्ही शिवसैनिक निजामाचे अत्याचार सहन करत आम्ही पुढे आलो आहोत. शिवसेनाप्रमुखांचा 1988ला मराठवाड्याला पदस्पर्श लागला आणि संपूर्ण चित्र बदललं. संपूर्ण मराठवाडा शिवसेनामय झाला आहे. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण बदलले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली आहे. आता कोरोनच्या संकट काळात त्यांनी केलेल्या कामामुळे जनता फिरू शकत आहे. मी मराठवाड्यात दौरे करतो. त्यावेळी जनता उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना दिसते. विरोधी पक्ष नेते काही बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. पण कोरोनामध्ये जनतेला वाचवण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, असं ते म्हणाले.

हिंदुत्व विसरत नाही –
आम्ही कधीही हिंदुत्व विसरत नाही. आमचे हिंदुत्वाचे कार्यक्रम चालू आहेत. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्ही कधीही हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यांचं वाक्य आमच्या मनावर कोरलं आहे, असं सांगतानाच मी शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करत आहे. बाळासाहेबांचे बाळकडूचे आमच्यावर संस्कार झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

सत्य बाहेर आलंच पाहिजे –
यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्दयावरही भाष्य केलं. शिवसेनेने राम मंदिराच्या जमीन घोटाळ्यावर टीका केली नाही. आम्ही फक्त सत्य बाहेर आलं पाहिजे, असं म्हटलंय. मी स्वत: राम मंदिरासाठी एक लाख 111 रुपयांची देणगी दिली आहे. शिवसेनेने एक कोटीचा निधी दिला आहे, असं ते म्हणाले.