उद्धव ठाकरेंनीच प्रताप सरनाईकांना मातोश्रीत लपवलं; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

0
229

मुंबई, दि. 19 (पीसीबी) : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असून त्यांना शोधून काढा अशी तक्रार भाजपाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी ही तक्रार केली असून यावेळी आंदोलनदेखील करण्यात आलं. दरम्यान यावेळी पोलीस ठाण्याबाहेर ‘आमदार झाले मिस्टर इंडिया’ अशी पोस्टरबाजी करत आमदारांना शोधून द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रताप सरनाईकांना मातोश्रीत लपवलं आहे असा गंभीर आरोप केला आहे.

ठाण्यातील वर्तकनगर येथे किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत साखळी आंदोलन केलं. ओवळा माजिवडा मतदार क्षेत्रातील आमदार प्रताप सरनाईक हे गेले अनेक दिवस अज्ञातवासात आहेत. ते हरवल्याची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे आले होते.

“१०० दिवस झाले असून प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

“कोविड काळात या मतदारसंघात हजारो लोक करोनाग्रस्त झाले असून आमदारांचा पत्ता नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. अशा घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचं काम करत आहेत याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचं असल्याचं ते म्हणाले आहेत.

मे महिन्यात प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

धाडी आणि चौकशीनंतर यावरून राज्यात बरंच राजकारण पेटलं होतं. मात्र, नंतर या प्रकरणाची चर्चा थंडावली होती. त्यानंतर अचानक ईडीचे अधिकार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर दाखल झाले होते.