निर्विवाद वर्चस्वासह इटली बाद फेरीत

0
392

रोम, दि.१७ (पीसीबी) : मॅन्युएल लॉकेटेल्ली आणि सिरो इममोबिल यांच्या गोलमुळे इटलीने युरो २०२० स्पर्धेत दुसऱ्या विजयासह बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यांनी स्वित्झर्लंडचा ३-० असा पराभव केला.

सलग दुसऱ्या विजयाने बाद फेरी गाठणारा इटली हा पहिला संघ ठरला असून, स्वित्झर्लंडचे आव्हान खडतर झाले आहे. या गटातून दुसऱ्या सामन्यात वेल्सने तुर्कीचा २-० असा पराभव केला. इटलीने अखेरच्या सामन्यात वेल्स वर विजय मिळविल्यास ते अव्वल स्थानाने बाद फेरीत प्रवेश करतील. या विजयातही इटलीसाठी वाईट बातमी म्हणजे त्यांना कर्णधार जॉर्जियो शिएलिनी याला गमवावे लागले. स्नायुच्या दुखापतीमुळे त्याला पूर्वार्धातच मैदान सोडावे लागले. युव्हेंटसचा ३६ वर्षीय बचावपटू शिएलिनी याने २०व्या मिनिटाला गोल केला होता. मात्र, रिव्ह्यू बघितल्यानंतर पंचांनी गोल हाताला लागून झाल्याचे सांगून फेटाळला. त्यानंतर मांडीच्या दुखापतीने त्याने मैदान सोडले. त्याच्या जागी फ्रान्सिस्को अॅसेर्बी याला मैदानात पाठविण्यात आले. त्याने वयाच्या ३३व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर सफाईदार खेळ करत इटलीने स लग दुसऱ्या सामन्यात तीन गोलने विजय मिळविला. पहिल्या सामन्यात त्यांनी तुर्कीला ३-० अशाच फरकाने हरवले होते.

इटलीचा विजय
सलग दहावा निर्विवाद विजय
सप्टेंबर २०१८ पासून २९ सामन्यात अपराजित
गेल्या दहा आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन किंवा अधिक गोल
एकही गोल न स्विकारता ३१ गोल केले
प्रशिक्षक मॅनसिनी अपराजित राहण्याच्या विक्रमापासून एक सामना दूर
यापूर्वी व्हिट्टोरियो पोझ्झो हे ३० सामने अ पराजित

लॉर्झेनो इनसाईन, डॉमेनिको बेरार्डी आणि इममोबिल या इचलीच्या तीन आक्रमकांनी स्वित्झर्लंडच्या बचाव फळीला भंडावून सोडले. यातही इममोबिल अधिक धोकादायक वाटत होता. इममोबिलच्या गोल करण्याच्या अनेक संधी हुकल्या. अन्यथा त्याची आणि इटलीची गोलसंख्या आणखी वाढली असती. शिएलीनी बाहेर गेल्यावर लॉकेटेल्लीने जबाबदारी घेतली आणि बेरार्डीच्या साथीत चाली रचण्यास सुरवात केली. या दरम्यान पुन्हा एकदा इममोबिल आणि इनसाईन यांना गोल करण्याची संधी साधता आली नाही. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमेर याने दोघांचे प्रयत्न हाणून पाडले. बेरार्डीच्या साथीत पहिला गोल केल्यावर लॉकेटेल्लीने निकोला बारेल्लाकडून मिळालेल्या पासवर २० यार्डावरून किक मारत दुसरा गोल केला. गेल्यावर्षी इटलीकडून पदार्पण केल्यानंत १२ सामन्यात त्याचा हा तिसरा गोल ठरला.

स्वित्झर्लंडक़ून झेर्डन शाकिरी आणि स्टिव्हन झुबेर यांनी सुरेख प्रयत्न केले. पण, त्यांना इटलीचा गोलरक्षक गिआनलुगी डोन्नारुम्मा याने रोखले.