निगडी मिलिंदनगर खून प्रकरणाचा काही तासातच उलगडा; पैशांच्या वादातून भावानेच केला भावाचा खून

0
879

निगडी, दि. ७ (पीसीबी) – निगडी परिसरातील मिलिंदनगर येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोघा भावांवर अज्ञातांनी हल्ला करुन त्यातील एकाचा खून केल्याचे वृत्त आज (रविवारी) सकाळी आठच्या सुमारास समोर आले होते. या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून मयत इसमाच्या मतिमंद भावानेच पैशांच्या वादातून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.  

तुकाराम गुरप्पा शिंगे (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुरेश गुरप्पा शिंगे असे खून करणाऱ्या मतिमंद भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तुकाराम आणि सुरेश हे दोघे भाऊ निगडीतील मिलिंदनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहत होते. तुकाराम हा व्यसनाधीन होता तर सुरेश हा मतिमंद असल्यामुळे तो भिक मागून उदरनिर्वाह करत होता. शनिवारी मध्यरात्री तुकारामला दारु पिण्यासाठी पैसे पाहिजे होते. यामुळे त्याने सुरेशकडे पैसे मागितले मात्र सुरेशने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. या झटापटीत सुरेश याने तुकारामच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला यामध्ये तुकारामचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश जखमी झाला. सुरेश वर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निगडी पोलिस तपास करत आहेत.