निगडी गावठाणात वयोवृध्द महिलेचे फळांचे दुकान जळाले; ५० हजाराचे नुकसान

0
1112

निगडी, दि. १५ (पीसीबी) – निगडी गावठाण येथील जय बजरंग तरुण मंडळाच्या शेजारी असलेल्या एका वयोवृध्द महिलेच्या फळाच्या दुकानाला आज (सोमवारी) पहाटे पाचच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत फळाच्या दुकानासह त्यातील फळे जळून खाक झाली असून एकूण ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

प्राधिकरण अग्निशमन विभागाचे भाऊसाहेब दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाचच्या सुमारास निगडी गावठाण येथील जय बजरंग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना तेथील फळाच्या दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती प्राधिकरण अग्निशमन दलाला दिली. यावर प्राधिकरण अग्निशमन विभागाची एक आणि वल्लभनगर अग्निशमन विभागाची एक अशा एकूण दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासात अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र दुकान आणि त्यातील फळे असे एकूण ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

ही कामगिरी अग्निशमन दलाचे जवान भाऊसाहेब दराडे, पदमाकर बोरावके, विलास कडू, शिवलाल झनकर, विष्णू चव्हाण, आणि भगवान यमगर यांच्या पथकाने केली.

दरम्यान घटनेत जळालेले फळाचे दुकान एका वयोवृध्द महिलेचे आहे. त्या निगडी गावठाण येथे ३० वर्षांपासून फळ विक्रीचा व्यवसाय करतात. आगीमध्ये दुकान जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महिलेवर दुखांचे आभाळ कोसळे असून पुढील उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न पडला आहे.