निगडीत लतादीदींना संगीतमय श्रद्धांजली..

0
223

पिंपरी दि. ३०(पीसीबी)- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल आयोजित वसंत व्याख्यानमाला समारोप कार्यक्रमात खास भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींना संगीतमय आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचंड उत्साहात सर्वांनी लतादीदीच्या गीतांना भरभरून दाद दिली.स्वाती महाजन पुणे प्रस्तुत कार्यक्रम ‘वो जब याद आये’ या कार्यक्रमात प्रमुख गायक दीपक महाजन, सोनाली नांदुरकर, मुग्धा इनामदार, भाग्यश्री बांगरे यांनी उत्तरोत्तर कार्यक्रमात रंगत आणली. तर, प्राजक्ता मांडके यांचे अभ्यासपूर्ण निवेदन यामुळे या कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. श्रोत्यांमध्ये सर्व वयोगट स्तरातील व्यक्ती उपस्थित होत्या. संपूर्ण गीतांचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला.

‘गगन सदन तेजोमय’ या प्रार्थनेने झालेली सुरुवात ‘मोगरा फुलला’ प्रमाणे गीते फुलत गेली. पुढे ‘एक प्यार का नगमा है’ , ‘वो जब याद आये’, ‘बेदर्दी बालमा’, ‘अजी रुठ कर यु कहा जा’, ‘इस मोड से जाते है’ त्याचप्रमाणे ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ ‘बेखुदी में सनम’ त्यानंतर सादर झालेले ‘ईश्वर सत्य है’ ‘होठो पे ऐसी बात’ ‘दिल तेरा दिवाना है सनम’ या गीतांमुळे कार्यक्रम बहरत गेला.

वादक अनिल करमरकर यांच्या सॅक्सोफोन वरील अप्रतिम गीताला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. अन्य वादकांमध्ये यश भंडारे, अभिजीत भदे, सचिन वाघमारे, कांचन निंबाळकर, विशाल गड्रतवार तसेच नितीन जाधव यांनी आपपापले कौशल्य प्रदर्शन करताना श्रोत्यांना पूर्णवेळ खिळवून ठेवले. शेवटी ‘परदेसी या’ ‘नैनो मे सपना’ ‘कोरा कागज था ये मन’ तसेच ‘पिया तोसे नैना लागे’ या गीतांना वन्स मोअर प्रतिसाद मिळाला. तर ‘अखेरचा हा तुला दंडवत’ या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाचा शेवट झाला. यावेळी श्रोत्यांनी उभे राहून आदरांजली व्यक्त केली.

व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. बाबासाहेब चव्हाण, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख उपस्थित होते. संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य ऍड चिंतामणी घाटे, प्रा.प्रकाश दीक्षित, प्रा.डॉ. संजय खरात, प्रा. डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्रा.डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. शशिकांत ढोले, रणजीत हगवणे, उद्धव खरे, दादाभाऊ शिनलकर, प्रमोद शिंदे समवेत आजीव सदस्य, आजीव कार्यकर्ता सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

विविध शाखांचे प्रमुख, पदाधिकारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी व सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण व्याख्यानमालेचे संयोजन राजीव कुटे, दिपक मराठे, मच्छिंद्र कांबळे, मृगजा कुलकर्णी व अन्य शाखाप्रमुख यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीती वाघोलीकर तसेच आभार प्रा.अतुल फाटक यांनी मानले.