निगडीत रिक्षा आणि कारमधील अपघातात जखमी वृध्द कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
656

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – रिक्षा आणि कारमधे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ६३ वर्षीय वृध्द कारचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात बुधवार (दि.२ जानेवारी) रात्री सव्वा आठच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील भेळ चौकात झाला होता.

कालिदास काळोखे (वय ६३, रा. क्यु १९, ध्रुवदर्शन, सेक्टर नं.२६, प्राधिकरण निगडी) असे मृत वृध्द कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू विनायक काळोखे (वय ६०) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास फिर्यादी विनायक काळोखे यांचे मोठे बंधू कालिदास काळोखे हे त्यांच्या ताब्यातील कार घेऊन निगडी प्राधिकरण येथील भेळ चौकातून जात होते. यावेळी अज्ञात रिक्षा चालकाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि पसार झाला. यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवायडरला जाऊन धडकली. यामुळे कार चालवत असलेले कालिदास यांच्या छातीला आणि हणवटीला गंभीर दुखापत झाली आणि ते बेशुध्द पडले. त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्या अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.