नाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटात हाणामारी; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड; लातूरात आमदाराला धक्काबुक्की

0
1090

नाशिक, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान गोंधळ झाल्याने दोन गटात धक्काबुक्की होऊन हाणामारी झाली. ही घटना नाशिक येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर घडली. दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे काही काळ तिथे तणावाचे वातावरण होते.

यावेळी पोलिसांनी गर्दीला पांगवल्याने पुढील प्रकार टळला. माजी आमदार माणिकराव कोकाटे स्टेजवर गेल्याने हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान परिस्थिती आता नियंत्रणात असून, प्रशासनाकडून आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकसह, पुणे आणि लातूरमध्ये देखील हिंसा पहायला मिळाली. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर काही आंदोलकांनी गोंधळ घालत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर चढून घोषणाबाजी केली. तर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना आडवले असता संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर चप्पल, बुट आणि काचाच्या बाटल्या फेकल्या. एवढेच नाही तर वृत्तांकन करणाऱ्या काही माध्यम प्रतिनिधींनाही धक्काबुक्की करण्यात आली.

तसेच लातूरमध्ये आजच्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कॉग्रसेचे आमदार त्र्यंबक भिसे मतदारसंघातील अनेक गावात फिरत होते. यावेळी भिसे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुम्ही समाजासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला. आंदोलकांनी भिसे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. काही लोकांनी आमदार भिसे यांना या गोंधळातून बाहेर काढले. दरम्यान काही आंदोलकांना त्यांना धक्काबुक्कीही केली.