नाणारवरून शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट; उद्धव ठाकरेंनी धमेंद्र प्रधानांना भेट नाकारली

0
504

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – रत्‍नागिरीतील नाणार प्रकल्‍पावरून शिवसेना व भाजप यांच्‍यामधील संबंध पुन्‍हा एकदा ताणले गेले आहेत. या प्रकल्‍पाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्यावा, म्‍हणून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरेंची गुरूवारी भेटीची वेळ मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. नाणार स्‍थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तसेच शिवसेनेने या प्रकल्‍पाला विरोध करून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे आश्वासन नाणार वासीयांना दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा विरोध झुगारून दिल्‍लीमध्‍ये सोमवारी या प्रकल्‍पाच्‍या सांमजजस्‍य करारावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

यानंतर या प्रकल्‍पाच्‍या संदर्भात मंत्री धमेंद्र प्रधान यांनी भेटीसाठी वेळ मागितल्‍यानंतर ‘करार करण्‍यापूर्वी कोणतीही माहिती दिली नाही. आता भेटून काय करायचे’, असे उत्‍तर उद्धव ठाकरेंने दिल्‍याची सुत्रांकडून समजते. दरम्यान, हा प्रकल्प रेटल्यास उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इशारा शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमधील संबंध अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.