‘नाणार’ला विरोध करणारी शिवसेना ढोंगी असून त्यांना कोकणातील जनतेशी काहीही देणेघेणे नाही – राधाकृष्ण विखे पाटील

0
498

नागपूर, दि.१३ (पीसीबी) – ‘नाणार प्रकल्पावरून भाजपला विरोध करत असलेली शिवसेना ढोंगी असून त्यांना कोकणातील जनतेशी काहीही देणेघेणे नाही. कोकणच्या जनतेसोबत शिवसेना प्रामाणिक असती तर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आलेल्या आंदोलकांनी त्यांना हाकलून लावले नसते’, असे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केले.

विखे म्हणाले की, ‘नाणार प्रकल्पाला लोकांचा प्रचंड विरोध असून, सरकार बनावट संमतीपत्रांच्या आधारे भूसंपादन करते आहे. नाणार प्रकल्पातील १७ पैकी १० गावांच्या सरपंचांनी भेट घेतली. या प्रकल्पाला सर्वच्या सर्व १७ गावांनी विरोध दर्शवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन संमती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहिल्या तीन गावांतच टोकाचा विरोध झाल्याने ग्रामसभा घेण्याचा विचार प्रशासनाला सोडून द्यावा लागला. या प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या नागरिकांची संमतीपत्रे घेतल्याचा दावा सरकार करते आहे. परंतु, हा दावा साफ खोटा आहे. मूळ कोकणवासी नसलेल्या बाहेरील काही नागरिकांनी या गावांमध्ये जमिनी खरेदी करून ठेवल्या होत्या; त्या नागरिकांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला देत असल्याचे संमतीपत्रे सरकारला दिली आहेत.’