मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही – राज्य सरकार

0
338

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. यापुढे सिनेरसिकांना मल्टिप्लेक्समधील महागडे पदार्थ घेण्याची गरज नाही. त्यांना बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. त्यासाठी कुणीही मज्जाव करू शकत नाही. कुणी आडकाठी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यावर कसलीही बंदी नाही. तशी मनाई कुणी करू शकत नाही. मनाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मल्टिप्लेक्समधील महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सर्व मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमती समान ठेवल्या जातील. जागा बदलली म्हणून वस्तूची ‘एमआरपी’ बदलू शकत नाही. एकाच वस्तूची किंमत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकत नाही. येत्या १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशनानंतर बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.