नागपूरमध्ये मद्यधुंद पोलीसाने मुख्यमंत्री फडणवीससह केंद्रीय मंत्री गडकरींना घातल्या शिव्या

0
1462

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – नागपूरच्या कुही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पाचगाव पोलीस चौकीत एका पोलीस कर्मचाऱ्याने दारु पिऊन धिंगाणा घालत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

प्रदीप मने असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री गावात झालेल्या एका भांडणाची तक्रार करायला काही तरुण पाचगाव पोलीस चौकीत गेले होते. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित प्रदीप मने नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणांची तक्रार लिहून घेण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली. पोलीस कर्मचारी पोलीस चौकीमध्येच मद्यधुंद अवस्थेत असल्याने तरुणांनी त्या कर्मचाऱ्याची ती अवस्था आणि वर्तन मोबाईलमध्ये चित्रित करणे सुरू केले. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी आणखी भडकला आणि त्याने मुख्यमंत्र्यांपासून, मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने शिव्या दिल्या.

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सामान्यांना मद्यधुंद अवस्थेत कशी वागणूक दिली जाते याची चर्चा आहे. शिवाय या कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.