नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे बनले देशाचे ४७ वे सरन्यायाधीश

0
740

नवी दिल्ली,दि.१८(पीसीबी) –नागपूरचे सुपुत्र न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांनी बोबडे यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदी बोबडेंच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारणारे न्या. बोबडे हे तिसरे महाराष्ट्रीय ठरले आहेत.

६३ वर्षांचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रंजन गोगोई यांची जागा घेतली आहे. त्यांचा सरन्यायाधीश म्हणून १७ महिन्यांचा कार्यकाळ असले. २३ एप्रिल २०२१ ला ते निवृत्त होणार आहेत.न्यायाधीश बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरात झाला.

शरद बोबडे यांनी १९७८ मध्ये नागपूरच्या एसएफएस कॉलेजमधून विधी विभागातून शिक्षण घेतलं. १३ सप्टेंबर १९७८ मध्ये नागपूरच्या हायकोर्टामध्ये अधिवक्ता म्हणून बोबडेंनी कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७८ साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य झाले.

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने १९९८ मध्ये बोबडे यांना वरिष्ठ अधिवक्ता म्हणून मान्यता दिली. शरद बोबडे यांनी मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यभार सांभाळला होता. २०१२ मध्ये शरद बोबडे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती. ते सुप्रीम कोर्टातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.