धवल, श्रेयसच्या कामगिरीने मुंबईचा विजय

0
463

जयपूर, दि.२४ (पीसीबी) :  वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीने मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राचा सहा गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना मरहाराष्ट्राने ९ बाद २७९ धावांचे आव्हान उभे केले. यश नहार (११९) आणि अझिम काझी (१०९) यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राला ही मजल शक्य झाली. मुंबईकडून धवल कुलकर्णीने ४४ धावांत ५ गडी बाद केले. मुंबईने ४७.२ षटकांत ४ बाद २८० धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने (१०९) शतकी खेळी करताना विजयात महत्वाची भूमिका बजावली.

महाराष्ट्राची सुरवात चिंताजनक होती. धवलच्या अचूक माऱ्यामुळे महाराष्ट्राने नवव्या षटकातच ३८ धावांत ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, केदार जाधव आणि अंकित बावणे हे प्रमुख फलंदाज गमावले. पण, यश नहार आणि अझिम काझी यांच्या आक्रमक फलंदाजीने मुंबईच्या गोलंदाजांना हैराण केले. धवलने आणलेले दडपण मुंबईचे अन्य गोलंदाज वाढवू शकले नाहीत. यश आणि अझिम यांनी त्यांच्या गोलंदाजीचा समाचार घेत चौफेर टोलेबाजी केली. या दोघांनी शतके ठोकताना पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी केली. अझिम आणि यश पाठोपाठ बाद झाल्यावर महाराष्ट्राचा डाव पुन्हा घसरला. यशने १३३ चेंडूंत ७ चौकार, ६ षटकाराच्या सहाय्याने ११९, तर अझिमने ११८ चेंडूंत १२ चौकार, २ षटकारांसह १०४ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला यशस्वी जैस्वाल आणि पृ्थ्वी शॉ यांनी ६७ धावांची सलामी दिली. पहिल्या सामन्यात शतक झळकाविणारा पृ्थ्वी (३४) बाद झाल्यावर ठराविक अंतराने यशस्वीही(४०) बाद झाला. पण, मुंबईच्या प्रत्येक फलंदाजांने उपयुक्त खेळी करताना छोट्या छोट्या भागीदारी केल्याने त्यांचा विजय सुकर झाला. श्रेयस अय्यर आणि सूर्या यांनी ४७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयसला शिवम दुबेने साथ केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. शिवम (४७) बाद झाल्यानंतर श्रेयसने आपले शतक साकार करत सर्फराज खानच्या साथीत मुंबईचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक –
महाराष्ट्र ५० षटकांत ९ बाद २७९ (यश नहार ११९ (१३३), अझिम काझी १०४ (११८), धवल कुलकर्णी ५-४४) पराभूत वि. मुंबई ४७.२ षटकांत ४ बाद २८० (श्रेयस अय्यर १०३ (९९), शिवम दुबे ४७ (३९), यशस्वी जैस्वाल ४०, पृथ्वी शॉ ३४, सत्यजित बच्छाव ३-५९)