कोविड काळात योध्दा बनुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होवु देणार नाही – महापौर माई ढोरे

0
267

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड दि. २२ फेब्रुवारी : महापालिकेच्या वैद्यकीय विभागामध्ये ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल, त्यावेळेस प्राधान्याने कोरोना काळात महापालिकेच्या रुग्णालयामध्ये विविध ठेकेदारांमार्फत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार करुन काम देणेत येईल. त्याबाबत प्रशासनास सुचना केल्या आहेत. तसेच यापुर्वी वैद्यकीय विभागातील विविध पदावर मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेमध्ये सामावुन घेणेबाबत महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करुन प्रशासनामार्फत शासनमान्यतेकामी प्रस्ताव सादर केलेला आहे. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झालेनंतर कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे त्याठिकाणी ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेल्या डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफ यांना मिळालेले तात्पुरते काम बंद झाले आहे.

या कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळवुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असुन कोविड काळात योध्दा बनुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या वेळेस डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफची गरज असेल किंवा ठेकेदारांमार्फत असे कर्मचारी भरती करावी लागेल त्या वेळेस अशा ठेकेदारांना काम देताना कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सभापती स्थायी समिती संतोष (अण्णा) लोंढे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी भेट घेवुन दिले. तसेच आंदोलकाच्या समस्या जाणून घेतल्या.

संपुर्ण देशासह पिंपरी चिंचवड शहरात कोविड-१९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मार्च २०२० पासुन वाढला होता. कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये शहरातील कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहु नये, यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून महापालिकेच्या वतीने कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर, जंम्बो रुग्णालय तयार करणेत आली होती. या रुग्णालयामध्ये विविध ठेकेदारांमार्फत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफ नियुक्त करण्यात आले होते. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झालेनंतर यापैकी बहुतांश कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे त्याठिकाणी ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेल्या डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफ यांना मिळालेले तात्पुरते काम बंद झाले आहे. काम मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु केले आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांची गुरुवार दि. १८ रोजी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवुन चर्चा केली.