ईस्ट बंगालला हरवत नॉर्थईस्ट चौथ्या स्थानी

0
374

फातोर्डा (गोवा), दि.२४ (पीसीबी) – हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने एससी ईस्ट बंगालला 2-1 असे हरविले. या विजयाबरोबरच नॉर्थईस्टने गुणतक्त्यात चौथे स्थान गाठत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच कायम राखली.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या आघाडी फळीतील केरळचा 28 वर्षीय खेळाडू सुहैर वडाक्केपीडीका याने संघाचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ईस्ट बंगालचा बचावपटू सार्थक गोलुई याच्याकडून स्वयंगोल झाला. तीन मिनिटे बाकी असताना सार्थकनेच ईस्ट बंगालची पिछाडी कमी केली, पण तेवढे प्रयत्न अपुरे ठरले. त्याआधी ईस्ट बंगालचा बचावपटू राजू गायकवाड याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले होते.

नॉर्थईस्टने 19 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून नऊ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. त्यांनी एफसी गोवा संघाला गुणांवर गाठले, तर हैदराबाद एफसीला मागे टाकले. हैदराबादचे 19 सामन्यांतून 28 गुण आहेत. आता या तिन्ही संघांचा एक सामना बाकी आहे. गोव्याचा गोलफरक 8 (31-23), नॉर्थईस्टचा 4 (29-25), तर हैदराबादचा 8 (27-19) असा आहे. ईस्ट बंगालला 19 सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व आठ बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण व नववे स्थान कायम राहिले.,

तिसऱ्याच मिनिटाला नॉर्थईस्टचा स्ट्रायकर याने चेंडूवर ताबा मिळवित पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. त्याने डावीकडे सहकारी स्ट्रायकर देशोर्न ब्राऊनला पास दिला. ब्राऊनने नेटच्या दिशेने फटका मारला, पण ईस्ट बंगालचा गोलरक्षक मिर्शाद मिचू याने बचाव केला. सहाव्या मिनिटाला नॉर्थईस्टला मिळालेला कॉर्नर आघाडी फळीतील सुहैर वडाक्केपीडीका याने घेतला. त्याने उजवीकडे ब्राऊनच्या दिशेने चेंडू मारला, पण प्रतिस्पर्धी खेळाडूने तो बाहेर घालविला. नवव्या मिनिटाला डावीकडून मॅचादोने आगेकूच केली आणि मध्यरक्षक इम्रान खान याला पास दिला. इम्रानने पुन्हा मॅचादोला पास देण्याचा प्रयत्न केला, पण मिचूने चेंडूवर आधीच ताबा मिळविला.