धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

0
290

मुंबई , दि. 14 (पीसीबी):सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास कायदेशीररित्या निवडणूक लढवण्यास मनाई असताना मुंडे यांना पाच मुले असल्याचं उघड झाल्याने त्यांची आमदारकीही धोक्यात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं आहे. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

डे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचीच माहिती दिली होती. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे यांचं हे प्रेमप्रकरण असल्याचं दिसतं. या संबंधातून त्यांना दोन मुलंही झाली आहेत. त्याबाबतची तक्रार त्यांच्या कायदेशीर पत्नीने करायला हवी किंवा पहिल्या पत्नीने तक्रार केली नसेल तर दुसऱ्या महिलेने तक्रार केली पाहिजे. तरच ती तक्रार ग्राह्य धरली जाते. इतरांनी केलेली तक्रार ग्राह्य धरली जात नाही. तशी तक्रार करण्याचा कायदेशीररित्या कुणालाही अधिकार नाही.