नागपुरात विचित्र घटना; डीजेच्या आवाजामुळे कोंबड्यांचा मृत्यू ?

0
248

नागपूर , दि. 1३ (पीसीबी): राज्यात बर्ड फ्लूचे संकट आले असतानाच आता नागपुरात डीजेच्या दणदणाटामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. याबाबत अधिकृत पुष्टी होऊ शकली नसली तरी पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचा मृत्यू हा डीजेच्या आवाजामुळेच झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

कळमेश्वरच्या उबगी फार्मवर हा प्रकार घडला. या परिसरात जोरदार आवाजात डीजे लावण्यात आला होता. त्यामुळे फार्ममधील कोंबड्या घाबरल्या आणि सैरावरा पळू लागल्या. या चेंगराचेंगरीत थोड्याथोडक्या नव्हे तर 250 कोंबड्यांचा मृत्यू झाला. राज्यात आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीमुळे या कोंबड्यांना रोगाची लागण झाली होती का, अशी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, तोपर्यंत या परिसरातल पोल्ट्री चालकांना प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर परभणीत चिकन, मटण आणि अंडी विक्रेत्यांना RTPCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व मांसविक्रेत्यांना ही टेस्ट करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 13 ते 18 जानेवारी या काळात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.