धक्के मारुन बाहेर काढण्याआधीच धोनीने निवृत्त व्हावे- सुनील गावसकर

0
423

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. ‘टीम इंडिया’ने आता त्याच्या पलीकडे पाहायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘धोनीच्या मनात काय आहे हे सध्यातरी कुणालाच माहीत नाही. भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो. पण मला वाटते आज तो ३८ वर्षांचा आहे. भारतीय संघाने आता पुढचा विचार करायला हवा. कारण, पुढील टी-१० विश्वचषकापर्यंत तो ३९ वर्षांचा असेल,’ असे गावसकर म्हणाले.

 

‘धोनी संघात असणे आजही फायदेशीर आहे हे खरे आहे. तो किती धावा करतो किंवा यष्टीमागे कशी कामगिरी करतो, यापेक्षा मैदानात त्याचे असणे हे संघाच्या कर्णधाराला धीर देणारे असते. त्याच्या सल्ल्याचा मोठा फायदा होतो. असे असले तरी आता ती (निवृत्तीची) वेळ आलीय. भारताला दोनदा विश्वचषक विजयाचा मान मिळवून देणाऱ्या धोनीने सन्मानाने जायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटले आहे.