धक्कादायक: शालेय साहित्याची मागणी केल्याने मुलीला विष पाजून मारुन टाकण्याचा प्रयत्न

0
305

नाशिक, दि. २२ (पीसीबी) – मुलीने शालेय साहित्याची मागणी केल्याचा राग आल्याने दारुड्या वडिलांनी मुलीला चक्क विष पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास नाशिकमधील शिंदे गावात घडली.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आरोपी वडिल पंढरीनाथ बोराडे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री इयत्ता सहावीत शिकणाऱ्या संबंधित मुलीने शालेय साहित्य विकत घेण्यासाठी वडिल पंढरीनाथ यांच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. मात्र दारुड्या वडिलांना या गोष्टीचा राग आल्यामुळे त्याने मुलीला मारहाण करत घरातील कीटकनाशक पाजून मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. सध्या मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धाकट्या मुलाने वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर वडील पंढरीनाथ बोराडेला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे.