धक्कादायक : महिला शिपायाला शारीरीक संबंधासाठी एसीबीच्या अधिक्षकाची १ कोटींची ऑफर; अधीक्षकावर गुन्हा दाखल होताच झाला फरार

0
2525

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला एक कोटी रूपये, पुण्यात फ्लॅट आणि दैनंदिन खर्च करण्यासाठी २० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाचा पोलीस अधीक्षक प्रद्‌युम्न पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पाटील हा रजेचा अर्ज देऊन फरार झाला आहे. तर एसीबीच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यांची चौकशी सुरू केली असून त्यांना अटक करण्यासाठी दोन पथके पुणे आणि कोल्हापुरला रवाना करण्यात आली आहेत.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी आपल्याच कार्यालयात कार्यरत असलेल्या एका २९ वर्षीय महिला पोलिस शिपायास एक कोटी रूपये, पुण्यात फ्लॅट, कार आणि दैनंदिन खर्चसाठी २० लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात पाटील यांनी तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, महिला कर्मचाऱ्याने ही ऑफर धुडकावून लावत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचलक संजय बर्वे यांच्याकडे पोलिस अधीक्षक पाटील यांची तक्रार केली होती.

याप्रकरणी बर्वे यांनी तातडीने एक चौकशी समिती गठित केली. त्यानंतर महिला शिपायाला मुंबईला बोलविण्यात आले. तिथे तिची सखोल चौकशी करण्यात आली. महिला शिपायाच्या मोबाईलवर पाटील यांनी पाठविलेले मेसेज, अश्‍लिल छायाचित्रे, व्हिडियो कॉलिंग, व्हॉईस कॉलिंग चौकशी समिथीने तपासले. तब्बल आठ दिवस चौकशी झाल्यानंतर चौकशी समितीने आपला अहवाल डीजी बर्वे यांना सादर केला. त्यानंतर बर्वे यांनी समितीतील एका सदस्याला नागपूरला पाठवून पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण पाटील यांना लागली होती. गुन्हा दाखल होताच पाटील यांनी किरकोळ रजेचा अर्ज टाकून कार्यालयातून पसार झाले.

महिला शिपायासोबत संवाद साधताना पाटील यांनी आपल्याला दर महिन्याला आरटीओ आणि रजिस्ट्रार कार्यालयाकडून २५ ते ३० लाख रुपये मिळतात असे सांगितले होते. त्याचप्रमाणे ही वसुली कोण करतो त्याचे नाव देखील सांगितले होते. त्यामुळे कोण अधिकारी पाटील यांना पैसे देत होते, याचीही चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिल्याचे समजते. सध्या पोलिसांचे दोन पथक प्रद्‌युम्न पाटील यांच्या मागावर आहेत ते त्यांचा पुणे आणि कोल्हापुर येथे शोध घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणात आरोपी पाटील यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागपुरातील एका वकिलाशी त्यांनी संपर्क केल्याची माहिती आहे. मात्र, पाटील यांनी स्वतःचा फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. दोन-चार दिवसात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तिकडे नागपूर शहर पोलिसांनी देखील पाटील यांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे.