धक्कादायक… महापौर यांच्या कंपनीलाच कोविड सेंटरचे कंत्राट

0
209

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला निशाणा साधला आहे. १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढण्याचे आव्हान देणाऱ्या किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांच्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट मिळाल्याची माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

“कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट किश कॉर्पोरेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. महापौरांनी स्वतःच्याच कंपनीला कंत्राट दिले. पुढच्या आठवड्यात मी जे कागदपत्रे देणार आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. याप्रकरणी मुंबईच्या महापौरांची ताबडतोब हकालपट्टी झाली पाहिजे. २०१७ पासून २० पर्यंत एक कोटींची उलाढाल असणाऱ्या किशोरी पेडणेकरांच्या कंपनीला महापालिकेने किती काम दिले हे महापौरांनी सांगावे. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी महापौरांच्या कंपनीला कंत्राट दिले,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

“मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकरांच्या कंपनीला किती कंत्राट दिले याची माहिती द्यावी. मुंबईच्या पालिका आयुक्तांनी किरीट सोमय्यांना आरटीआय अंतर्गत एकपण कागद देऊ नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत. पण महापालिकेत प्रामाणिक अधिकारीही आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिनसेनेवर निशाणा साधत मुंबई महापालिकेत घोटाळे झाल्याचे आरोप केले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. ” “शिवसेनेसाठी मुंबई महानगर पालिका ही कमाईचे साधन आहे. कोविड काळात यांनी केलेले शेकडो कोटींचे घोटाळे मी आता मुंबईकरांसमोर मांडण्यास सुरुवात करत आहे. लुटायचे कसे यासाठी पवार ठाकरेंनी मंत्रालयामध्ये शिबीर आयोजित केल्याचे दिसते. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.