धक्कादायक: मंत्रालयातील सचिवाने पत्नीवर गोळीबार करुन घेतला गळफास

0
517

सोलापूर, दि. २२ (पीसीबी) – मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नीवर गोळीबार करुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थीर असल्याचे समजते आहे.

मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजयकुमार भागवत पवार हे मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. कौशल्य विकास विभागात ते कार्यरत होते. पवार हे मंगळवेढ्यातील घरी आले होते. विजयकुमार यांचा गुरुवारी रात्री पत्नीशी वाद झाला होता, असे समजते. शुक्रवारी पहाटे त्यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली. गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, विजयकुमार यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. मंगळवेढा पोलीस तपास करत आहेत.