लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या मदतीला “1950” हेल्पलाईन; सर्व जिल्ह्यात २४ तास सुरू

0
757

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत मतदारांना विविध प्रकारची मदत आणि माहिती देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “1950” ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत करण्यात आले आहेत. ही हेल्पलाईन राज्यातील सर्व जिल्ह्यात २४ तास सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक माहिती कधीही मिळण्यास मदत होणार आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून “1950” या हेल्पलाईनवर मतदारांचे दररोज कॉल येत आहेत आणि विविध माहितींची विचारणा केली जात आहे. त्यामध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मार्गदर्शन मागणारे सर्वाधिक कॉल्स आहेत. त्यामुळे या हेल्पलाईनद्वारे मतदारांच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे.

या हेल्पलाईनवर नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधी माहिती देणे, नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन, मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास, मतदार यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन, मतदान ओळखपत्र व मतदान अर्ज निगडीत सर्व माहिती, मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांमधून माहिती, निवडणूक संदर्भातील कोणतीही तक्रार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवता येईल.