धक्कादायक : भारतात पैसे कमावण्यासाठी खासगी हॉस्पिटल करतात सिझेरियन प्रसूती

0
1928

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भारतात फक्त जादा पैसे कमावण्यासाठी खासगी हॉस्पिटल हे महिलांचे गरज नसताना देखील सिझेरियन प्रसूती करत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे. अहमदाबादमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ ने केलेल्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

देशात वर्षभरात ७० लाख महिलांची प्रसूती झाली असून यातील तब्बल ९ लाख महिलांची गरज नसताना सिजेरियन प्रसूती करण्यात आल्याचे या शोध अहवालात म्हटले आहे. गरज नसताना महिलांची सिझेरियन प्रसूती केल्याने लोकांच्या खिशाला नाहक भार पडला असून बाळाला स्तनपान करण्यास उशीर झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे नवजात बाळाचे वजन कमी होते अनेकांना श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी महिला व त्यांचे नातेवाईक सरकारी हॉस्पिटलपेक्षा खासगी हॉस्पिटलांना प्राधान्य देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) च्या २०१५-१६च्या आकडेवारीनुसार, खासगी हॉस्पिटलमध्ये ४०.९ टक्के सिजेरियन प्रसूती तर सरकारी हॉस्पिटलमध्ये केवळ ११.९ टक्के प्रसुती करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सिझेरियन प्रसुतीमागे डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलांचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू होता, हे स्पष्ट झाले आहे, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. नैसर्गिक प्रसूतीत खर्च खूप कमी होतो तर सिजेरियनमध्ये २० ते २५ हजारांपर्यंत खर्च येत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.