धक्कादायक: चिखलीत अल्पवयीन मुलीचा विवाह, छळ अन् गर्भपात

0
614

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – एका अल्पवयीन मुलीच्या घरच्यांवर दबाव आणून तिचा विवाह करण्यात आला. विवाहानंतर पतीसह सासरकडच्यांनी तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच तिला मारहाण करून गर्भपात केला. ही धक्कादायक घटना एप्रिल २०१८ ते मे २०१९ या कालावधीत जाधववस्ती, वडगाव शिंदे, पुणे येथे घडली.

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अक्षय धनाजी जाधव (वय२४) आणि सासू पुष्पा धनाजी जाधव (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे, तर सासरे धनाजी किसन लाधव (वय ४५, तिघेही रा. जाधववस्ती, वडगाव शिंदे), पतीची आत्या रुक्मिणी पांडूरंग गायकवाड (वय ५५) आणि अश्विनी गणेश गायकवाड (वय २६, दोघीही रा. गायकवाड वस्ती, टोलनाक्याजवळ, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असताना देखील आरोपींनी तिच्या आई-वडिलांवर दबाव आणून तिचा आरोपी अक्षयसोबत विवाह लावून दिला. तिच्या इच्छेविरूद्ध पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शरीरसंबंध ठेवण्यासाठी नकार दिला असता आरोपींनी पिडीत विवाहीतेला शिवीगाळ आणि मारहाण केली. पीडिता गर्भवती राहीली असता आरोपींनी ‘आम्हाला हे मूल नको’ म्हणत पीडितेला उपाशी ठेऊन मारहाण केली. तिच्या पोटात लाथा-बुक्क्यांनी मारल्याने गर्भ मृत झाला. त्यामुळे पिडीत विवाहीतेचा गर्भपात करावा लागला. त्यानंतर आरोपींनी मुलीला नांदवण्यासाठी माहेरच्या लोकांकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले, तरच तिला नांदवणार असल्याची धमकी दिल्याने मुलीने थेट पोलिसात धाव घेत गुन्हा केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.