विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात

0
511

लंडन, दि. ५ (पीसीबी) – विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानसमोर बांगलादेशला ७ धावांच्या आत सर्वबाद करण्याचे आव्हान होते. मात्र, हे आव्हान पाकिस्तानी गोलंदाज पूर्ण करु शकले नाहीत. फिरकीपटू मोहम्मद हाफिजने पहिले षटक निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली. मात्र मोहम्मद आमिरच्या दुसऱ्याच षटकात बांगलादेशी सलामीवीरांनी ७ धावा काढून  पाकिस्तानला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. 

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने ३१५ धावा काढल्या. बांगलादेशला ३१६ धावांचे आव्हान दिले. मात्र आपले आव्हान कायम टिकवण्यासाठी पाकिस्तानला किमान ३०८ धावा करणे गरजेचे होते. इमाम उल-हक, बाबर आझम आणि इमाद वासिम या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारली.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फखार झमान मोहम्मद सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला.