दोन हत्या प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपालला जन्मठेप!

0
435

हिस्सार, दि. १६ (पीसीबी) – हरयाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपालला हिस्सार सत्र न्यायालयाने आज (मंगळवारी) दोन हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रामपालसह एकूण १३ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.आर.चालिया यांनी २०१४ सालच्या या प्रकरणात रामपालला शिक्षा सुनावली.

देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेल्या स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार न्यायालयाने ११ ऑक्टोंबरला दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले होते. रामपालला शिक्षा सुनावताना न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिस्सारच्या बरवाला शहरात रामपालचा सतलोक आश्रम होता. १९ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याच्या आश्रमात चार महिला आणि एक लहान मुल मृतावस्थेत सापडले होते. त्यावेळी पोलिसांनी रामपाल आणि त्याच्या २७ समर्थकांविरोधात हत्या आणि अन्य आरोपांप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.

२०१४ साली पोलीस पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळी रामपालचे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली होती. रामपालचे सर्व सुरक्षारक्षक शस्त्रसज्ज होते. त्याने त्या दिवशी अटक टाळण्यासाठी समर्थकांचा मानवी ढालीसारखा वापर केला होता.