दोन वाहिन्यांमधील कुस्ती शरद पवारांनी यशस्वीपणे सोडवली

0
941

पुणे, दि. २६ (पीसीबी) – मराठीतील दोन आघाडीच्या वाहिन्यांनी नुकतीच एका कुस्ती लीगची घोषणा केली आहे. मात्र, या लीगच्या आयोजनावरुन दोन्ही वाहिन्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. यावर कार्यकारिणीशी बोलून निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. तसेच या विषयावर निर्णय घेण्यासाठी सात सदस्यांची समिती नेमण्यात येईल, ही समिती जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल, असेही पवार यांनी सांगितले.

या वादावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी कात्रजच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात बैठक झाली. या बैठकीत कोणत्या वाहिनीची कुस्ती आधी घ्यायची, याचसोबत स्थळ-वेळ आणि तारखांची निश्चीती करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. ही समिती यावरचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दोन्ही वाहिन्यांनी आयपीएलच्या आधारावर कुस्ती लीग स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. मात्र, निर्माण झालेल्या वादांमुळे दोन्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी राज्य कुस्तीगीर परिषदेकडे धाव घेतली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी कालच्या बैठकीत एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.