तुम्ही गे आहात? रक्तदात्याला प्रश्न विचारला जाणार

0
859

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – रक्तदान करण्यासाठी गेलेल्या रक्तदात्याला साधारणपणे तुम्ही आजारी आहात काय? तुम्हाला कोणता गंभीर आजार आहे काय? यापूर्वी गंभीर आजार झाला होता काय? तुम्ही आतापर्यंत किती वेळा रक्त दिलं आहे? असे प्रश्न विचारले जातात. पण यापुढे मात्र रक्तदात्याला आणखी एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि तो म्हणजे ‘तुम्ही गे आहात काय?’…घाबरू नका. हा प्रश्न सर्वांसमोर विचारला जाणार नाही. तर एका फॉर्मवर हा प्रश्न विचारला जाणार आहे. एखाद्या पुरुषाचे अनेक पार्टनर तर नाहीत ना? याची खातरजमा करण्यासाठीच हा प्रपंच केला जाणार आहे.

नॅशनल ब्लड ट्रान्स्फ्युजन काऊंसिल या संस्थेने मुंबईतील रक्त पेढ्यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये एक अपडेटेड फॉर्म दिला आहे. त्यात रक्तदात्यांच्या निवडीबाबत काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात गे आणि बाय-सेक्स्युअल पुरुष, ट्रान्सजेंडर आणि देहविक्रय करणाऱ्या महिला कधीच रक्तदान करू शकत नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे. या लोकांमध्ये एचआयव्ही आणि हेपिटायटीस-‘बी’ आणि ‘सी’ची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे इतर रुग्णांच्या जीवाला धोका संभवू शकतो, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.