अपक्ष आमदारांसह चंद्रकांत पाटील गुवाहाटीला रवाना

0
324

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे जवळपास ३० हून अधिक आमदारांना घेऊन सुरतला रवाना झाले होते. त्यानंतर सुरतवरून त्यांनी सर्व आमदारांचा मुक्काम मुंबईपासून जवळपास २७०० किमी दूर आसाममधील गुवाहाटी येथे हलवला आहे. बुधवारी मध्यरात्रीच ते सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्वरित सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते.

पण त्यांच्या आदेशाला न जुमानता शिवसेनेच्या दोन आमदारांसह ३ अपक्ष आमदार गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह योगेश कदम, मंजुळा गावीत, माधुरी मिसाळ आणि गोपाळ दळवी यांचा समावेश असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.

विशेष म्हणजे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावलं होतं. मी मुंबईला येतोय, असं सांगून पाटील आज सकाळी जळगावहून सुरतला गेले आणि तेथून थेट गुवाहाटीला रवाना झाले आहेत. चंद्रकांत पाटील आणि योगेश दळवी चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पाच नवीन आमदार गुवाहाटीला रवाना झाल्याने एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ आणखी वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.