देश असा होणार मोबाईल उत्पादनाचे प्रमुख केंद्र

0
331

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – देशात मोबाइल उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोडक्शन इंसेटिव्ह योजना आणली आहे. या ४१ हजार कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेमध्ये तैवानमधील फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन तसेच शाओमी, सॅमसंग कंपन्यांनी रुची दाखवली आहे. पीएलआय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी या कंपन्यांनी अर्ज केले आहेत. देशातील लावा, डिक्सॉन इलेक्ट्रॉनिक्स, कार्बन, ऑप्टीमस इन्फ्राकॉम आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे रुची दाखवली आहे.

फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते. पूर्व लडाखमध्ये तणाव असल्यामुळे ओपो, विवो या चिनी मोबाइल कंपन्यांनी मात्र जास्त उत्साह दाखवलेला नाही. पीएलआय योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक करुन नोकऱ्यांची निर्मिती करावी लागेल.
पुढच्या काही वर्षात देशांतर्गत मोबाइल उत्पादनला चालना देण्याबरोबरच भारताला मोबाइल उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवून निर्यातक्षम बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. आमच्या या योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. कुठल्या कंपनीची निवड केली ते लवकरच आम्ही जाहीर करु असे उच्चपदस्थ सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
फॉक्सकॉनने दोन तसेच लावा, डिक्सॉन इलेक्ट्रॉनिक्स या दोन देशी कंपन्यांसाठी सुद्धा दोन अर्ज केले आहेत. या योजनेतंर्गत देशात मोबाइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना काही लाभ मिळतील. पाच भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निवड करण्याची योजना आहे.

आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे. अ‍ॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.