‘देशाला काँग्रेसने बलशाही केलं, मात्र आता मोदी देश विकायला निघालेत’: काँग्रेसची मोदींवर सडकून टीका

0
411

सांगली, दि.१० (पीसीबी) : नुकताच आपण देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं केलं. गेल्या 75 वर्षात देशाला काँग्रेसने बलशाली केले, मात्र मोदी सरकार आता देश विकायला निघालं आहे. त्यामुळे देश धोक्यात आल्याने सत्तेसाठी नव्हे तर देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांची गेल्या साठ वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी केलेली सेवा या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा काँग्रेस कडून आमदार कदम यांचा लोकसेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कडेगावच्या वांगी येथील सोनहीरा साखर कारखाना परिसरात हा सोहळा पार पडला.

या प्रसंगी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस पक्षाने 75 वर्षात देश बलशाली करण्याचं काम केलं. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील लोकं देश विकायला निघाले आहेत. त्यामुळे 2024 हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज देश आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता आली पाहिजे, आणि ही सत्ता देश वाचवण्यासाठी असणार आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सत्तेतलं केंद्र सरकार देश कसा विकायला निघालेले आहेत, याची जाणीव करुन दिली पाहिजे, त्यामुळे येत्या काळात कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागलं पाहिजे, असं ते म्हणाले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु असल्याच्या चर्चा मधल्या काळात सुरु होत्या. मात्र, भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला डावलून चालणार नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात. अशावेळी आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पवार यांनी आज ‘मुंबई तक’ला सविस्तर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत आणि देशातील एकूण राजकीय स्थितीबाबत भाष्य केलं.

‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली.