देशांतर्गत क्रिकेटला मुश्ताक अली करंडकाने सुरवात

0
191

नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) – कोरोनाच्या संकट काळानंतर देशांतर्गत क्रिकेटची घडी बसवताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर देशांतर्गत क्रिकेट मोसमाची सुरवात करण्याचा मुहुर्त शोधला. सईद मुश्ताक अली टी २० करंडक स्पर्धेने मोसमाला सुरवात होईल.

ही स्पर्धा १० ते ३१ जानेवारी दरम्यान सहा विविध केंद्रावर खेळिवण्यात येईल. सहभागी होणाऱ्या राज्य संघटनांनी आपला प्रवेश २ जानेवारीपर्यंत निश्चित करायचा आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ई-मेल द्वारे ही माहिती सर्व राज्य संघटनांना कळविली आहे. मात्र, या पत्रात रणजी करंडक स्पर्धा होणार की नाही याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

रणजी करंडक आणि विजय हजारे करंडक स्पर्धा घेणार आहोत. पण, त्यासाठी मुश्ताक अली स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण व्हावी लागेल. या स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. रणजी आणि विजय हजारे स्पर्धांविषयी सलंग्न संघटनांनी आपली मते कळवायची आहेत. या सर्वांच्या मताचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शहा यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

स्पर्धा आयोजित करताना त्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेण्याचे बीसीसीआयचे धोरण राहणार आहे. त्यामुळे मुश्ताक अलीनंतर बीसीसीआय विजय हजारे करंडक स्पर्धा घेण्याची शक्यता आहे. रणजी करंडक स्पर्धेतीला सामन्यांना चार दिवस लागतात, त्यामुळे ही स्पर्धा संपण्यास अधिक वेळ लागेल आणि हजारे करंडक स्पर्धा मुश्ताक अली स्पर्धेप्रमाणे लवकर संपू शकते हा विचार त्यामागे असू शकतो.