देवेंद्र फडणवीस यांच्या `त्या` माहितीवर राष्ट्रवादीचे मौन का ?  

0
223

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – “ज्यावेळी शिवसेना सोबत येत नाही, हे आमच्या लक्षात आलं, तेव्हा आमच्यासमोर कोणते पर्याय असू शकतील, याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. म्हणजे अजित पवार नाही…थेट राष्ट्रवादी!”, असे विधानसभेतील विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. दरम्यान, बातम्यांवर सद्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे. थेट राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांच्याबाबत केलेले हे विधान असूनही राष्ट्रवादीने मौन पत्करले असून ते खुपच बोलके आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत स्वाभाविकपणे फडणवीसांना विधानसभा निवडणुकीतील सत्ता स्थापनेच्या डावपेचांसंदर्भात प्रश्न विचारले गेले. त्यावेळी फडणवीस यांनी सर्व घटनाक्रम आणि डावपेचासह विस्तारने सांगितले. राष्ट्रवादीची व्युहरचना कशी होती आता काय स्थिती आहे हे लक्षात आल्याने अनेकांना धक्का बसला. शरद पवार यांचे आतले डावपेच फडणवीस यांच्या मुलाखतीतून लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादीतून तत्काळ खुलासा, स्पष्टीकरण येईल अशी अटकळ होती. प्रत्यक्षात कुठलेच उत्तर नसल्याने गूढ वाढले आहे.

फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितलं, “यासंदर्भात योग्य त्या चर्चादेखील झाल्या होत्या. एका चर्चेत मी होतो. एकात मी नव्हतो. ज्या लेव्हलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसलो होतो. दोन तीन दिवस असे होते की, आम्ही मनातून हे सरकार आपलं नसेल असं ठरवून टाकलं होतं. त्या तीन-चार दिवसांत कुठलीच कृती आम्ही केली नाही. ”

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं, “पण त्या तीन-चार दिवसांनंतर अजित पवारांकडून आम्हाला फिलर आला. आमची त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी म्हटलं, की मला हे मान्य नाही.

जे शरद पवारांनी आधी सांगितलं होतं, त्यानुसार स्थिर सरकार भाजप आणि राष्ट्रवादीच देऊ शकतं, असं माझं आजही स्पष्ट मत आहे. पण जर पवारसाहेब शब्दावरुन आता बदलत असतील, तर हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं मला वाटतं. यातून राज्याचं नुकसान होईल. म्हणून तुमच्यासोबत सरकार बनवायला मी तयार आहे.”

त्यादिवशी काय घडलं?

23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांबरोबर असलेल्या संख्याबळापैकी जवळपास सर्वच आमदार शरद पवारांकडे परत आले. त्यामुळे अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अवघ्या 80 तासात हे सरकार पडलं.

अजित पवार ‘अनरिचेबल’ झाले. राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांची अजित पवार हे आता पक्ष सोडून गेले असं वाटत होतं. आज राष्ट्रवादी पक्षचं नाही तर पवार कुटुंबातही फूट पडली, असं व्हॉट्सअॅप स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना योग्य वेळी बोलू, असं त्या म्हणाल्या. पण हे बोलताना त्या भावूक झाल्या.

या सर्व प्रकारानंतर आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. अजित पवार यांनी मी राष्ट्रवादीतच आहे आणि यापुढेही राहणार, असं ट्विट केलं. त्यामुळे पुन्हा राजकीय चक्रं फिरू लागली. अजित पवार पक्षात पुन्हा सक्रिय झाले.

त्याचवेळी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं, “योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन.”

अजित पवार मागे का फिरले? सरकार स्थापनेचा प्रस्ताव कोणी दिला होता? याबाबत कोणीही समोर येऊन बोललं नाही. या घटनेला 7 महिने उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलंय.

देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना प्रतिक्रिया विचारली. याबाबत बोलण्यासाठी अनेकांनी नकार दिला. काहीजणांचे फोन बंद होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली.

त्यांनी म्हटलं, ‘फडणवीस याआधी सांगत होते की, शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा करतेय. आता ते सांगतायत राष्ट्रवादी आणि आमची चर्चा सुरू होती. हे काहीही असलं तरी शरद पवारांनी भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला हे आजचं सत्य आहे. आमचं तीन पक्षाचं सरकार चाललंय हे देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वीकारलं पाहिजे. याआधीच्या गोष्टींमध्ये कोणाला रस नाही’. व्यतिरिक्त अन्य प्रश्नांवर नवाब मलिक यांनी बोलणं टाळलं.

महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र एकत्रितपणे सत्ता स्थापनेची ऑफर मोदींनी आम्हाला दिली होती पण नम्रपणे मी ती नाकारल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या बोलण्यात विसंगती जाणवतेय. ही विसंगती असली तरीही देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती देत असल्याचं एकाही राष्ट्रवादीच्या नेत्याने ठामपणे सांगितलं नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे, पण दुसरीकडे सरकार बनवितानाच्या ज्या घडामोडी झाल्या ते सांगताना फडणविस यांनी दिलेली माहिती खरी की खोटी याबाबत राष्ट्रवादीतून एकही नेता बोलत नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची गोची?

महाराष्ट्रात घडलेल्या त्या राजकीय घटनांवर आधारित असलेलं 36 DAYS : A Political Chronicle of Ambition, Deception, Trust and Betrayal या पुस्तकाचे लेखक कमलेश सुतार सांगतात, “अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. जेव्हा अजित पवार यांनी बंड केलं होतं तेव्हाही यावर पक्षातले कोणी नेते बोलत नव्हते.

याचं कारण ते पक्षाच्या नेत्याने केलेल्या बंडापेक्षा पवार यांच्या कुटुंबात झालेलं बंड होतं. त्यामुळे तेव्हाही अजित पवार यांच्यावर कोणीही भाष्य करायचं नाही असं नेत्यांनी ठरवलं होतं. ती घटना म्हणजे पवार कुटुंबीयांसाठी नाजूक विषय होता. त्यामुळे तेव्हाही कोणी राष्ट्रवादीचा नेता त्यावर बोलला नाही.”

त्यानंतर अजित पवार आले. उपमुख्यमंत्री झाले आणि आजही ते राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची तेव्हाही कोंडी झाली होती आणि आजही ती परिस्थिती कायम आहे म्हणून राष्ट्रवादीचे नेते यावर भाष्य करणं टाळतायेत, असं कमलेश सुतार यांनी म्हटलं.

फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना संपर्क केला. पण सर्वांनी यावर बोलण्यास नकार दिला. यामागे एक कारण असू शकतं- त्यावेळी झालेली चर्चा ही वरिष्ठ पातळीवर झालेली असेल त्यामुळे इतर नेत्यांना त्या चर्चेची कल्पना नसावी. जर यावर कोणत्या नेत्याने माहितीअभावी भाष्य केलं तर भाजप आक्रमक होईल यातून राष्ट्रवादी पक्ष हा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे नेते यावर बोलायला नकार देतायत. जर खुलासा करायचा असेल तर स्वतः शरद पवारच करतील असं सांगितलं जातं आहे.