दुसऱ्या ऑनलाईन चेस ऑलिंपियाडसाठी भारतीय सज्ज

0
541

पुणे, दि.०७ (पीसीबी) :पहिल्या ऑन लाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील संयुक्त विजेते असणारा भारतीय संघ दुसऱ्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. जगज्जेता ग्रॅंड मास्टर विश्वनाथन आनंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार असून, उद्या ८ सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय संघ या वेळी चेन्नईतील ताज कोरोमंडल हॉटेलमधून खेळणार आहे.

ग्रॅंड मास्टर अभिजित कुंटे आणि विदीत गुजराती हे महाराष्ट्राचे खेळाडू संघात असून, कुंटे संघाचा न खेळणारा उपकर्णधार असेल. विदित गुजराथी हा खुल्या गटातून खेळेल. विश्वनाथन आनंद, विदीत गुजराथी, पेंटाला हरिकृष्णन, अधिबन बास्करन, कोनेरु हंम्पी, हरिका ड्रोनावली, भक्ती कुलकर्णी, तानिया सचदेव, निहाल सरीन, आर. प्रग्यानंदा,आर. वैशाली आणि सविता श्री यांचा भारतीय संघात समावेश आहे. बहुतेक खेळाडू चेन्नईतून खेळणार असले, तरी हरिकृष्णा प्राग, हंम्पी विजयवाडा, तर हरिका हैदराबाद येथून सहभागी होणार आहेत.

गेल्या वर्षी आम्हाला मायदेशात असूनही खेळायला कठिण गेले होते. आता या वेळी आम्ही एकत्रच असू, त्यामुळे फरत पडेल. वातावरण चांगलेच सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया विश्वनाथन आनंद याने व्यक्त केली. भारताच्या आव्हानाविषयी बोलताना आनंदने मार्मिक टिप्पणी केली. आमच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. पण, त्याचा बाऊ करू नका. सर्वच संघ बलवान आहेत. आम्हाला प्रत्येक लढत काळजीपूर्वक खेळावी लागेल, असे तो म्हणाला.

या स्पर्धेत अव्वल विभागात ४० देश सहभागी आहेत.चार गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

गेल्यावर्षी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण होती. या वेळे तसे होणार नाही. सर्वोत्तम इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या मायक्रोसेन्सने या वेळी ती जबाबदारी घेतली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सचिव भरत सिंग चौधरी यांनी व्यक्त केली आहे.