जोकोविचचा ग्रॅंड स्लॅम झपाटा कायम

0
585

न्यूयॉर्क, दि.०७ (पीसीबी) : गोल्डन स्लॅममध्ये नोव्हाक जोकोविच अपयशी ठरला असला, तरी त्याने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत आणखी एक पाऊल टाकले. कडवा प्रतिकार करून त्याने ब्रुक्सबीचा पराभव करून अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जोकोविचला आता ५२ वर्षाच्या इतिहासात कॅलेंडर वर्षात ग्रॅंड स्लॅम पूर्ण करण्याची संधी मिळेल. त्यासाठी त्याला तीन विजय आवश्यक आहेत. असे करणारा तो पहिला टेनिसपटू असेल. जागतिक क्रमवारीत अव्वरल स्थानावर असलेल्या जोकोविचने अमेरिकेत्या जेन्सन ब्रुक्सबी याचे आव्हान १-६, ६-३, ६-२, ६-२ असे परतवून लावले. त्याची गाठ आता इटलीच्या सहाव्या मानांकित मॅट्टेओ बेर्रेट्टिनी याच्याशी पडणार आहे. विंबल्डनच्या अंतिम फेरीत जोकोविचने याचाच पराभव करून विजेतेपद मिळविले होते. जोकोविचने अखेरच्या २० गेमपैकी १५ गेम जिंकल्या. शारीरिक क्षमतेची कसोटी लागलेला हा सामना जोकोविचने २ तास ५९ मिनिटात जिंकला.

बेर्रेटिनी याने १४४व्या स्थानावरील जर्मनीच्या ऑस्कर ऑट्टे याया ६-४, ३-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. ऑस्करने पात्रता फेरीतून इथपर्यंत मजल मारली होती. अन्य लढतीतून जर्मनीच्या चौथ्या मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेव याने आगेकूच कायम राखताना इटलीच्या १३व्या मानांकित यान्निक सिन्नेर याचे आव्हान ६-४, ६-४, ७-६(९-७) असे संपुष्टात आणले. झ्वेरेवची गाठ आता दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिस याच्याशी पडणार आहे. त्याने अमेरिकेच्या रेईली ओपेल्का याचा ६-७(६-८), ६-४, ६-१, ६-३ असा पराभव केला.

महिला एकेरीत ११व्या मानांकित बेलिंडा बेन्सिच याने पोलंडच्या सातव्या मानांकित इगा स्विआटेकचा ७-६(१४-१२), ६-३ असा पराभव केला. एम्मा रॅडुकानु हिने अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्स हिचा ६६ मिनिटात ६-२, ६-१ असा पराभव केला. पात्रता फेरीतून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचणारी रॅडुकानु तिसरीच टेनिसपटू ठरली. यापूर्वी अशी कामगिरी २०१७ मध्ये काया कानेपी आणि बार्बरा गेर्केन हिने १९८१ मध्ये केली होती.

चेक प्रजासत्ताकच्या चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिने आगेकूच कायम राखताना रशियाच्या अॅनास्तासिया पावल्युचेन्कोवा हिचा ७-५, ६-४ असा पराभव केला.