दुचाकी वेगाने न चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरुन सांगवीत अपंगासह एकाला टोळक्यांकडून जबर मारहाण

0
1775

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – जेवणानंतर आपल्या पुतण्यासह शतपावली करण्यास निघालेल्या अपंग व्यक्तीने, दुचाकी वेगाने न चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरुन आठ ते नऊ जणांच्या टोळक्यांनी अपंग व्यक्तीस लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्या पुतण्यावर वार केले. ही घटना जुनी सांगवी येथे बुधवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास घडली.

अजय (वय ४१) आणि तेजस (वय २१) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहे. यातील अजय हे अपंग आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, उमेश माने, सागर नायर, ओंकार चव्हाण, सोन्या आणि अज्ञात पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे अजय हे त्यांचा पुतण्या तेजस सोबत शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी आरोपींनी वेगाने दुचाकी त्यांच्यासमोरुन नेली. यामुळे अजय आणि त्यांचा पुतण्या तेजस याने आरोपींना दुचाकी हळू चालवा असे बोलले. याचा राग मनात धरुन आरोपींना आणखी काही साथीदारांना बोलावून अजय आणि तेजस यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तर अजय याच्यावर धारदार हत्याराने वार केले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.