दुकानदार महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक

0
280

पिंपरी, दि.28 (पीसीबी) : दुकानात घुसून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यातील तिघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजता भोसरी-आळंदी रोडवर नावकर फॅशन या दुकानात घडली.

सेजल दिलीप राठोड (वय 25, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेणुका सुहास सुवर्णकार (वय 40), प्रथमेश सुहास सुवर्णकार (वय 18), निलेश दिलीप सुवर्णकार (वय 22), ऋषिकेश शाहू चव्हाण (वय 20, सर्व रा. भोसरी) आणि अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रथमेश, निलेश आणि ऋषिकेश यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड यांचे आळंदी रोडवर नावकर फॅशन नावाचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी फिर्यादी, त्यांचे आई, वडील, भाऊ, बहिण आणि दुकानातील कामगार दुकानात होते. त्यावेळी आरोपी जबरदस्तीने दुकानात आले. त्यांनी दुकानातील ग्राहकांना बाहेर जाण्यास भाग पाडले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.