दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस

633

सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – दसऱ्याला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू असताना आता दिवाळीचा मुहूर्त काढण्यात आला आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सोलापुरात दिली.  

मुख्यमंत्र्यांना याआधी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण कधी हे मात्र आताच सांगणार नाही, असे म्हटले होते. आता दिवाळीला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती.  या बैठकीत शिवसेनेबरोबर जागावाटप, एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, प्रदीर्घ काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. ठराविक कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत असते. मात्र, आता दिवाळीला तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार का? याकडे इच्छुक आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे.