दापोडीत महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांना अटक

0
530

दापोडी, दि. ८ (पीसीबी) – मुलाला शाळेच्या बस स्टॉपवर सोडून घरी परतणाऱ्या एका महिलेचा दोन तरुणांनी अश्लिल हावभाव करुन विनयभंग केला. ही घटना दापोडी येथे घडली.

याप्रकरणी २७ वर्षीय पिडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, विवेकानंद सिकंदर ठाकूर (वय २७, रा. मोशी. मूळ रा. बिहार), बबलू ऊर्फ झहिअली करीम (वय ३४) आणि घुगे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २७ वर्षीय महिला ही तिच्या मुलाला दापोडी येथील शाळेच्या बस स्टॉपवर सोडून घरी परतत होती. यावेळी आरोपी विवेकानंद आणि बबलू हे दोघे पिडीतेचा पाठलाग करुन अश्‍लिल शेरेबाजी करत होते, तर घुगे हा त्याचा गैरफायदा घेऊन पीडितेशी अश्‍लिल वर्तन करत होता. या प्रकरणी पिडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विवेकानंद आणि बबलू या दोघांना अटक केली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.