चार वर्षांपासून एकच माणूस आरोप करतोय, लक्ष द्यायची गरज नाही-पंकजा मुंडे

0
727

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मी घेतलेला प्रत्येक निर्णय भ्रष्टाचाराने कसा बरबटलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून एकच माणूस करतो आहे. या आरोपाला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही. असे म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोबाइल घोटाळा प्रकरणातले सगळे आरोप फेटाळले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणाही साधला आहे. जे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत त्याबाबत माझ्या विभागाने खुलासा पाठवला आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत मोबाईल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ‘वर्षभरापूर्वी देखील मोबाईल खरेदीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी याच स्पेसिफिकेशनचे १ लाख २० हजार ३३५ मोबाईल ४६ कोटी रुपयांना खरेदी केले जाणार होते. मात्र आम्ही संशय व्यक्त केल्यावर वर्षभर ही प्रक्रिया मंदावली होती. आता निवडणुकीच्या तोंडावर या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून ३० ते ४० कोटी रुपयांमध्ये येणाऱ्या मोबाईल फोनसाठी तब्बल १०६ कोटी रुपये मोजण्यात आले. हा घोटाळा असून यातून नेमका कोणाला लाभ झाला, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ज्या कंपनीला हे १०६ कोटी रुपये किंमतीचे मोबाईल पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीची अधिकृत शेअर कॅपीटल फक्त ५ कोटी ५० लाख आणि पेड अप कॅपीटल केवळ ४ कोटी ९२ लाख ६५ हजार इतके असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. यापुर्वी देखील विभागाने मोबाईल खरेदी करीत असतांना अनाकलनीयरित्या अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या उत्पादनालाच निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची अट टाकल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊनही पुन्हा अशाच प्रकारे खरेदी होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. या मोबाईल खरेदीच्या निर्णयात तातडीने स्थगिती देऊन या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

मात्र या आरोपानंतर पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये प्रतिक्रिया देत गेल्या चार वर्षांपासून एकच माणूस माझ्याविरोधात सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करतो आहे. त्या आरोपांना काहीही अर्थ नाही असे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.