दहा रुपये किलो भंगारात विकलेली सावळज गावची खुर्ची लंडनला कशी पोचली ?

0
504

मुंबई,दि.२६(पीसीबी) – बाळू लोखंडे हे सामान्य कुटूंबातील. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज गावात मोलमजुरी करुन पोट भरणारे. काही वर्षापूर्वी त्यांनी मंडप व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी हुबळी कर्नाटक येथून खुर्च्या घेतल्या होत्या. त्यावेळी चोख माल विकला जात असल्याने या एका खुर्चीचे वजन तब्बल १३ किलो होते.

खुर्च्या मजबूत असल्या तरी वजनामुळे खुर्ची हलविणे अवघड ठरू लागले. तर बदलत्या काळात प्लास्टिक खुर्च्यांची मागणी वाढली. त्यामुळे काही वर्षापूर्वी लोखंडे यांनी यातील काही खुर्च्या सांगलीतील कवठेमहांकाळ येथे भंगारात १० रुपये किलो दराने विकून टाकल्या. काही खुर्च्या आजही आठवण म्हणून त्यांच्या संग्रहात आहेत. भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत पोहोचल्या. दुर्मिळ खुर्च्या म्हणून एका परदेशी व्यवसायिकाचे याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यातून या खुर्च्या थेट सातासमुद्रापार लंडनला पोहोचल्या.

तेथील रेस्टॉरंट मालकाने या खुर्च्या विकत घेतल्या आणि आता त्या रेस्टॉरंट ग्राहकांची सेवा मजबुतीने बजावत आहेत. या रेस्टॉरंट मालकाची खासियत म्हणजे, या खुर्च्यांच्या मागे लिहिलेले बाळू लोखंडे, सावळज हे नाव त्याने आहे तसेच ठेवले. यामुळेच तर लोखंडे यांच्या लोखंडी खुर्चीचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून व बातम्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला.