दहा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे भाजी, किराणा खरेदीसाठी बाजारपेठा फूल्ल

0
244

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – सोमवार पासून पुन्गा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन असल्याने किराणा, भाजी आणि अन्य साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांतून आज दिवसभर फूल्ल गर्दी होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बहुतांश ‘वाईन शॉप’च्या पुढे खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या.

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दोन्ही महानगरपालिका क्षेत्रात 10 दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून10 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. पुन्हा घराबाहेर पडायला मिळणार नाही म्हणून लोकांनी पुढच्या दहा दिवसांचा विचार करून माल खरेदीसाठी गर्दी केली होती. पिंपरी मार्केट अक्षरशः खचाखच भरलेले होते. भाजी मंडई सकाळी १० वाजताच रिकामी झाली. कापड, किराणा भुसार आणि अन्य साहित्याच्या दुकानींतूनही तुडूंब गर्दी पहायला मिळाली. लॉकडाऊनच्या भीतीने ग्राहक भाजीपाला, किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांची खरदी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन झालेले नाही. मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत असल्यामुळे उलट कोरोनाचा आणखी वेगात प्रसार होण्याची भिती आहे.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले असताना देखील सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून नागरिक खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहेत. पिंपरी प्रमाणेच चिंचवडगाव, स्टेशन, आकुर्डी, भोसरी, सांगवी, थेरगाव या भागातील बाजारपेठांमध्ये गर्दी होती. पिठाच्या गिरणीवर अगदी नंबर लावून दोन-तीन तासांनी दळण मिळत होते.

शहरात संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार असले तरी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याबाबत अजून सविस्तर आदेश यायचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.