दम असेल तर सगळ्यांची ईडी चौकशी करा; उदयनराजेंनी अजित पवारांना दिले आव्हान

0
198

सातारा,दि.१८(पीसीबी) – माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा एमआयडीसीत उद्योग का येत नाहीत? असा सवाल करत भाजप खासदार उदनयराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी नेत्यांमुळे रखडला आहे. टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असे सांगत अजित पवारांनी त्यांच्याकडे आलेला व्हीडिओ देत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना चौकशी करण्याची सूचना केली होती. अजित पवारांच्या या आरोपाला आता उदयनराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा’ असं आव्हान उदयनराजे यांनी अजित पवारांना दिले.

अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ‘साताऱ्यात एमआयडीसीची स्थापना झाली त्यावेळी मी तर शाळेत होतो, त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले की, ज्यावेळी सातारच्या एमआयडीसीला परवानगी दिली त्यावेळी अन्य जिल्ह्यात एमआयडीसीची परवानगी दिली. तेथील परिस्थिती आज किती चांगली आहे. मग साताऱ्याची दयनीय अवस्था झाली त्यासाठी जबाबदार कोण आहे?. तुमची पण जबाबदारी होती ना? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, उपमुख्यमंत्री आहात. त्यावेळी तुम्ही पालकमंत्री मंत्री होतात. त्यावेळचे आमदार, खासदार यांची पण जबाबदारी होती, त्यांनी लक्ष का दिले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता. या कंपन्या साताऱ्यातून जाण्यास कारणीभूत कोण आहे ? असं असताना खंडणी मागतो असा माझ्यावर आरोप केला जात आहे. मी पक्षाला घरचा आहेर दिला असे बोलले जाते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहात ते ठरवा. हे लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही त्यांना ओळख देत नाहीत. पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल, असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली.