भाजपा नेते प्रसाद लाड यांच्याशी संबंधीत कंपनीतील कामगारांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही

0
433

पुणे, दि. १८ (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांच्याशी संबंधित क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या एक हजार ५८० सुरक्षा कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून वेतन झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याच कंपनीकडे पुणे शहराच्या शेजारील पिंपरी चिंचवड महापालिकेतीलही काही कामांचे ठेके आहेत.

दोन्ही महापालिकेत गेली पाच वर्षे भाजपाची सत्ता होती
पुणे महाापलिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना एक जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ याकालावधीसाठी सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचा करार करण्यात आला आहे. या संपूर्ण काळात महापालिकेकडून एक हजार ५८० कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी कंपनीला ४२ कोटी रूपये द्यायचे आहेत. एप्रिल व मार्च या दोन महिन्यांची बिले कंपनीने महापालिकेला दिलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेला रक्कम अदा करता आली नसल्याचे महाापलिकेतील सूत्रांनी सांगितले.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्या काळात या कंपनीकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कंत्राट देण्याचा करार करण्यात आला आहे. १४ मार्च २०२२ रोजी भाजपाची पुणे महापालिकेतील सत्ता संपुष्टात आली. कंपनीकडून बिले आली नाहीत त्यामुळे त्याचे पैसे अदा करण्यात आले नाहीत, असे महपालिकेतील सूत्रांनी सांगितले.

तब्बल एक हजार ५८० कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास ही कंपनी असमर्थ ठरली आहे. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. ही कंपनी आमदार प्रसाद लाड यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असल्याने या संदर्भात आमदार लाड यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.