थेरगावमध्ये पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताकडून खून

0
1018

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – एका पाच वर्षीय चिमुकल्याचा अज्ञाताने खून करुन मृतदेह पडीक इमारतीच्या ढिगाऱ्या खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (दि.८) चिमुकल्याचा मृतदेह थेरगाव येथील अक्षय पार्क सोसायटीजवळील पुणे गेटच्या पाठीमागच्या पडिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत चिमुकल्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वाकड पोलिसांना माहिती मिळाली कि, थेरगाव येथील अक्षय पार्क सोसायटीजवळील पुणे गेटच्या पाठीमागच्या पडिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका बालकाचा मृतदेह आहे. यावर वाकड पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे पुरुषजातीचा अंदाजे ३ ते ५ वर्ष वयोगटातील एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या चिमुकल्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. मृत चिमुकल्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. सहायक पोलिस निरीक्षक एन.डी.सस्ते तपास करत आहेत.