त्सित्सिपासने नदालला ठेवले विक्रमापासून दूर

0
239

मेलबर्न, दि. १७ (पीसीबी) : स्पेनच्या राफेल नदाल याला कारकिर्दीमधील विक्रमी २१व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदापासून दूर रहावे लागले. ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने त्याचा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपू्र्व फेरीत पराभव केला. पाच सेट पर्यंत रंगलेली लढत त्सित्सिपासने ३-६, २-६, ७-६(७-४), ६-४, ७-५ अशी जिंकली.

उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नदाल एकही सेट हरलेला नव्हता. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर त्याचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. पण, जेव्हा तिसरा सेट टायब्रेकमध्ये गेला तेव्हापासून पारडे बदलण्यास सुरवात झाली. या सेटच्या विजयाने प्रेरित झालेल्या त्सित्सिपासने मग लढत निर्णायक सेटमध्ये नेली. निर्णायक सेटमध्ये ५-५ अशा बरोबरीनंतर त्सित्सिपासच्या हातून दोन मॅच पॉइंट असे निसटून गेले. पण, तिसऱ्या मॅच पॉइंटला मात्र आपल्या ताकदवान बॅकहॅंडच्या फटक्याने त्याने कारकिर्दीमधील एक सर्वोत्तम विजय नोंदविला.

या विजयानंतर माझ्यापाशी बोलण्यासारखे काहीच नाही. एखाद्या पक्षाप्रमाणे मी हवेत उडतोय असे मला वाटत आहे आणि प्रत्येक जण माझ्यासाठी झटतोय असे मला वाटत आहे. काय बोलू काहीच कळत नाही. शब्दच नाहीयेत, अशी प्रतिक्रिया त्सित्सिपासने व्यक्त केली. उपांत्य फेरीत आता त्याची गाठ रशियाच्या डॅनिल मेदवेदेवशी पडणार आहे. त्याने आपल्याच देशाच्या आंद्रे रुब्लेव याचे आव्हान ७-५, ६-३, ६-२ असे मोडून काढले. कुमार गटापासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या मेदवेदेव आणि रुब्लेव यांनी दोनच आठवड्यापूर्वी रशियाला एटीपी करंडक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

आजच्या लढतीत दोघांनाही पायात क्रॅम्प आले होते. लढतीनंतर कोर्टवरील मुलाखतीपूर्वी त्याला डाव्या मांडीवर मसाज करून घ्यावा लागला. मेदवेदेवने याचा उल्लेख आपल्या मुलाखतीत आवर्जुन केला. आज प्रथमच येथे उष्ण हवामानाचा त्रास जाणवला. मला शेवटी शेवटी त्रा झाला. त्यापेक्षा मी रुब्लेवला थकलेला पाहून आश्चर्यचकित झालो. कारण सरावा दरम्यान मी त्याला प्रशिक्षकासोबत सलग पाच पाच तास सराव करताना पाहिले आहे. त्या वेळे तो कधीच थकत नाही. मी त्याला गमतीने ड्युरासिलचा बॅटरी म्हणायचो. ती कशी संपत नाही, तसा हा कधीच थकत नाही, असे मेदवेदेव म्हणाला.