त्या रात्री नेमके काय घडलं?; रेल्वे ड्रायव्हरने दिला लेखी जबाब

0
3735

चंदीगढ, दि. २१ (पीसीबी) – अमृतसरच्या जोडा फाटकजवळ दसऱ्याच्या दिवशी रेल्वेने दिलेल्या धडकेत रावण दहनचा सोहळा बघणाऱ्या ६१ जणांचा मृत्यू झाला होता. त्या रेल्वेचे ड्रायव्हर अरविंद कुमार यांनी आपला लेखी जबाब दिला आहे. अरविंद यांनी त्या दिवशी रेल्वेचा चार्ज घेण्यापासून अपघातानंतरचा घटनाक्रम आपल्या जबाबात दिला आहे. अपघातानंतर गाडी थांबण्याच्या स्थितीत आली होती, मात्र अचानक लोकांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे रेल्वेतील इतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे थांबवली नाही, असे  अरविंद यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

अरविंद कुमार यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की,  ‘मी १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ट्रेन नंबर डीपीसी ११०९१ चा चार्ज घेतला आणि जालंधरच्या फलाट क्रमांक १ वरून ५ वाजून १० मिनिटांनी निघालो. संध्याकाळी ६ वाजून ४४ मिनिटांनी मानांवाला येथे पोहोचलो, ६ वाजून ४६ मिनिटांनी मला पिवळा सिग्नल आणि नंतर हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर अमृतसरच्या दिशेने पुढे निघालो. मानांवाला आणि अमृतसरमध्ये गेट क्र. २८ आणि गेट सिग्नल ग्रीन पास करून ट्रेन पुढे निघाली. त्यानंतर गेट क्र.२७ आणि दोन्ही गेट सिग्नल सातत्याने हॉर्न वाजवत पास केले.

त्यानंतर जेव्हा ट्रेन केएम-नं. ५०८/११ जवळ पोहोचली त्यावेळी समोरच्या ट्रॅकवरुन ट्रेन क्रं. १३००६ डीएन येत होती. अचानक लोकांची मोठी गर्दी ट्रॅकवर दिसली आणि तातडीने हॉर्न वाजवत इमर्जन्सी ब्रेक दाबले. इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतरही गाडीखाली अनेक लोकं चिरडली गेली होती. गाडीचा वेग कमी झाला होता आणि गाडी जवळपास थांबण्याच्या स्थितीत होती, पण तेवढ्यात लोकांनी गाडीवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे गाडीत बसलेल्या इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन मी गाडी पुढे नेली आणि अमृतसर स्थानकावर आलो. तोपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मी घटनेची माहिती दिली होती’.